पुणे : गेल्या वर्षी मार्चपासून केवळ तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांसाठी खुल्या असलेल्या शहरातील सर्व न्यायालयांत आता इतर प्रलंबित आणि नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या दाव्यांवर सुनावणी होणार आहे. मंगळवार (दि. 15) पासून शहरातील सर्व प्रकारच्या न्यायालयांचे कामकाज दिवसभर (सकाळी ११ ते सायंकाळी ५.३०) पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रलंबित असलेल्या दाव्यांना आता गती मिळणार आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर राज्यात टप्प्याटप्याने अनलॉक सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आता पुणे महानगरपालिका हद्दीत न्यायालयाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना मुंबर्इ उच्च न्यायालयाकडून जिल्हा न्यायालयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कामकाजाची वेळ कशी असेल याबाबतचे परिपत्रक प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांनी काढले आहे. शहरातील वकील संघटनांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
शहरातील न्यायालये पूर्ण क्षमतेने पूर्ण वेळ सुरू होणार असली तरी पिंपरी-चिंचवडमधील न्यायालये पूर्ण वेळ सुरू करण्यात परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील न्यायालये पूर्वीप्रमाणे एकाच शिफ्टमध्ये सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेतच सुरू राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील इतर न्यायालये पूर्णवेळ सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
न्यायालये पूर्ण दिवस चालू होणार असले तरी कॅन्टीन मात्र बंद राहणार आहे. तसेच सर्व बार रूम्स ५० टक्के आसन क्षमतेने उघडे ठेवण्यात येणार आहे. तर बार रूम्स व टेबल स्पेसच्या ठिकाणी पक्षकारांना बोलाविण्यास परवानगी देण्यात आलेले नाही.
कोट :
प्रमुख जिल्हा न्यायाधीशांबरोबर सोमवारी मीटिंग झाली आहे. उच्च न्यायालयाने प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीनुसार न्यायालय सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे जिल्हा न्यायाधीशांना कळविलेले आहे. त्याप्रमाणे पुणे शहरातील न्यायालये उद्यापासून पूर्ण दिवस व पूर्ण क्षमतेने चालू होणार आहेत.
कोरोनाविषयक सर्व निकष पाळून व पक्षकारांना गरज नसेल तर न बोलविता न्यायालयीन कामकाज करावे, असे आवाहन वकिलांना केले आहे.
ॲड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन