पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची हद्द वाढण्याची शक्यता

ग्रामीणचे चार पोलीस ठाणे वर्ग करण्यासाठी हालचाली सुरु

0

मुंबई : पुणे शहर आणि ग्रामीण यांची पोलीस ठाणे वर्ग करुन तयार झालेले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या लवकरच हद्द वाढण्याची शक्यता आहे.
कारण या आयुक्तालयात वडगाव मावळ, कामशेत, लोनावळा शहर, लोनावळा ग्रामीण या पोलीस स्टेशनचा समावेश करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. पोलीस महासंचालकांनी संबंधितांकडून याबाबत तात्काळ अभिप्राय मागवला आहे.

पुणे ग्रामीणच्या हद्दीतील ही पोलीस ठाणे वर्ग करण्यात यावीत असा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठविला आहे. पोलीस महासंचालकांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामपंचायतीकडून या संदर्भात अभिप्राय घेण्यास सांगितले आहे.

तसेच ग्रामसभेतील ठराव व त्यावरील ग्रामसभेचा निर्णय संबंधीत ग्रामपंचायतीकडून प्राप्त करुन पोलीस महासंचालक कार्यालयास त्वरीत सादर करावा, असे निर्देश दिले आहेत. या हालचालींना वेग आल्याने लवकरच हद्द वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये पिंपरी, चिंचवड, निगडी, सांगवी, वाकड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, चाकण, आळंदी, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, देहुरोड या पोलीस ठाण्याचा सध्या समावेश आहे.

सध्या म्हाळुंगे (चाकण) पोलीस चौकी, शिरगाव पोलीस चौकी, रावेत पोलीस चौकी आणि बावधन पोलीस चौकीला निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच या चौक्या पोलीस ठाणे करावेत असाही प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यलयास पाठविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.