पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना पकडलेल्या मुख्य विधी सल्लागार मंजूषा इधाटे यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.
इधाटे यांना त्यांच्या कार्यालयात पन्नास हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ( दि. १४) रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले होते. इधाटे यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
तांत्रिक विश्लेषणासह या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी, निरनिराळ्या व्यक्तींचे जबाब घ्यायचे आहेत. त्यासाठी पाच दिवस पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकील ऍड. रमेश घोरपडे यांनी केली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ज्योती पाटील यांनी छाप्याबाबतची माहिती न्यायालयास दिली.
छाप्याची पूर्ण कार्यवाही झाली असून आरोपी तपासाला सहकार्य करीत असल्याने पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याची बाजू आरोपीचे वकील प्रताप परदेशी यांनी मांडली.