नवी दिल्ली : कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर आता आणखी एका बुरशीचा संसर्ग समोर आला आहे. रुग्णांना काळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. मात्र आता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाला हिरव्या बुरशीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
कोरोनावर मात केलेल्या एका ३४ वर्षीय रुग्णाला हिरव्या बुरशीची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील या रुग्णाला उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे.
आपल्याला म्युकरमायकोसिसचा (काळी बुरशी) संसर्ग झाल्याची भीती असल्याने रुग्णाने चाचणी केली असताना ही माहिती समोर आली.
श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (SAIMS) छातीच्या आजार विभागाचे प्रमुख डॉक्टर रवी दोशी यांनी याविषयी माहिती दिली. ‘हा रुग्ण कोरोनामधून बरा झाला होता. दरम्यान त्याला आपल्याला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याच संशय आला. यामुळे त्याने चाचणी केली असता याउलट फुफ्फुस, रक्तात हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं’.
कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये असणारा हिरवी बुरशी संसर्गाचा प्रकार इतर रुग्णांच्या तुलनेत वेगळा आहे का यावर संशोधनाची गरज असल्याचं डॉक्टर रवी दोशी यांनी म्हटलं आहे. या रुग्णाला दोन महिन्यांपूर्वी करोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.