नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यामध्ये फेरबदलही करण्यात येणार आहे. दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षांतील मंत्रालयाच्या कामकाजाचा लेखाजोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असून २० कॅबिनेट मंत्री व स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावाही घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे केलेली ही प्रक्रिया म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची नांदी समजली जात आहे. महाराष्ट्रातील दोघांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
या बैठकीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि अन्य मंत्री उपस्थित होते. २०१६ मध्येही अशाच प्रकारे विविध मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला होता. पंतप्रधानांसह ५५ मंत्री सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे आणखी २३ मंत्र्यांचा समावेश करून विस्तार केला जाऊ शकतो.
मंत्रिमंडळात सामील होण्याची इच्छा नसली तरी वायएसआर काँग्रेसला लोकसभेचे उपाध्यक्ष पद दिले जाऊ शकते. तर जनता दल युनायटेडला दोन कॅबिनेट मंत्रीपदे दिली जातील. त्याशिवाय पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र, उत्तर प्रदेशला अधिक प्रतिनिधित्व दिले जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळात तीन कॅबिनेट मंत्र्यांसह उत्तर प्रदेशचे ८ मंत्री आहेत.