मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजे भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

वाचा सविस्तर.....

0

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सहा मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं खासदार उदयनराजेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

काय आहेत मागण्या

1. सारथी संस्था ही मराठा समाजातील विद्यार्थी, बेरोजगार तरूण तरूणींना शैक्षणिक आणि व्यवसायाची दिशा देणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेवून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सारथी’ संस्थेची कार्यालये प्रत्येक महसूल विभागात सुरू करावीत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात ‘सारथी’ संस्थेची उपकेंद्रे सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत. त्याकरीता संस्थेला कमीतकमी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करून पायाभूत सुविधा उभ्या कराव्यात.

2.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरूण-तरूणींच्या हाताला काम मिळावे तसेच स्वयंरोजगार निर्मीती करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी उद्योग-व्यवसाय निर्मितीचा कार्यक्रम हाती घ्यावा. त्याकरीता या महामंडळाला कमीतकमी 2 हजार कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा. लाभार्थी पात्रतेसाठीची प्रक्रिया अधिक सुलभ करावी, महामंडळामार्फत व्याज परताव्याची १० लाख रूपयांची मर्यादा वाढवून ती किमान 25लाख रूपये करावी. याची अंमलबजावणी येत्या अधिवेशनाआधी करावी.

3.मराठा आरक्षणाच्या अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली असताना राज्य शासनाने 9 सप्टेंबर 2020 रोजी भरती प्रक्रियेला स्थागिती दिली. त्यामुळे राज्यातील 2185 उमेदवारांना शासनाने सेवेत सामावून घेतले गेले नाही. याबाबतीत शासनाने सदर उमेदवारांना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे. ही बाब सरकारच्या अधिकारात असून सरकारने यात कसलाही हलगर्जीपणा न करता या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र द्यावे.

4. डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह भत्ता योजनेतून सुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुमारे 100 कोटींचे लाभ गेल्या सरकारच्या काळात देण्यात आले होते. तसेच लाभ आताही देण्यात यावेत. प्रत्येक जिल्ह्यांत वसतीगृह उभारणे ही बाब पूर्णत: राज्य सरकारच्या अखत्यारीतील आहे. त्यावर तातडीने कारवाई करावी. जोवर वसतीगृह तयार होत नाहीत, तोवर हा भत्ता देण्यात यावा. मराठा विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृहांच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सुसज्ज अशी वसतीगृहांची उभारणी करावी. जेणेकरून मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शहरामध्ये शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींमुळे होणारी गैरसोय दूर होईल. तसेच शासनाकडून दिला जाणारा वसतीगृह निर्वाह भत्ता अपूरा असून या रकमेत वाढ करावी.

5.आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये Super Numerary Seats निर्माण करून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची तरतूद करावी. अनेक शैक्षणिक संस्थाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे हा निर्णय अत्यंत तातडीने घेणे आवश्यक असून त्याबाबतची अधिसूचना तात्काळ काढावी. जेणेकरून मराठा विद्यार्थ्यांचा अडमिशनचा प्रश्न मार्गी लागेल.

6. राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ 605 हून अधिक अभ्यासक्रमांना देण्याचा निर्णय हा गेल्या सरकारमध्ये झाला होता. मेडिकल आणि इंजिनिअरिंगसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शुल्क प्रतिपूर्ती करणारी ही अतिशय चांगली योजना आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.