पुणे : व्यावसायिकाची जमीन बळकाविण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे तसेच मारहाण केल्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
नीलेश उमेश शेलार (वय ४०, रा. मानकर रेसिडेन्सी, कोथरूड) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मयत दीप्ती काळे तसेच नितीन मनोहर हमने (वय ३१, कात्रज) याच्यासह आणखी दोघांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मंगळवार पेठेत राहणा-या एका महिलेने या बाबत फिर्याद दिली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत पोलिसांनी शेलार याला अटक केली होती. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत त्याला ताब्यात घेत पोलिसांनी गुरुवारी (ता.१७) न्यायालयात हजर केले.
आरोपीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. गुन्ह्यांतील पाहिजे असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यासाठी, गुन्ह्यांत वापरलेले पिस्तूल आरोपीने कोणाकडून आणले याचा तपास करण्यासाठी तसेच पिस्तूल जप्त करण्यासाठी त्याला सात दिवसाची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केली. शेलार याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
काळे हिने फिर्यादीच्या पतीबरोबर जवळीक साधली होती. तसेच काळे हिने फिर्यादीच्या पतीस बांधकाम व्यवसायासाठी 35 लाख रुपये दिले होते. त्या बदल्यात त्यांच्या पतीकडून कोयाळी, मरकळ (ता.खेड) येथील तीन कोटी रुपयांची 42 गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली होती. तर उरलेली 58 गुंठे जमीन नावावर करून दे नाहीतर तुझ्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. आरोपी नीलेश व नितीन यांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण करून 58 गुंठे जमीन नावावर करून द्या नाहीतर तुझ्या फिर्यादीच्या पतीस जीवे मारू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.