पुणे : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने एकाच वेळी 5 शहरात छापे टाकून 12 जणांना ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी दिवसभरात जळगाव, धुळे, औरंगाबाद, मुंबई आणि पुणे शहरात 15 पथकांनी छापे टाकले.
सराफ तथा हाॅटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला, जयश्री शैलेश मणियार (सर्व रा. जळगाव) जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेश लोढा (रा.जामनेर), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रितेश चंपालाल जैन ( रा.धुळे), अंबादास आबाजी मानकापे ( रा.औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला ( रा. मुंबई) व प्रमोद किसनराव कापसे (रा.अकोला) या 12 जणांना गुरुवारी एकाच वेळी ताब्यात घेतले आहे.. यासाठी 15 पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रेम कोगटा यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले.
पुणे पोलिसांनी सकाळी 6 वाजता अचानक एकाचवेळी पाच ठिकाणी छापे घातले असून त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील व्यावसायिक भागवत भंगाळे यांना तर ते सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना पोलिसांनी ताब्यात घेऊन नजिकच्या पोलीस ठाण्यात नेले. त्याचवेळी जामनेर येथे पंचायत समितीच्या माजी सभापती यांना ताब्यात घेतले आहे. जळगाव, भुसावळ, अमळनेर, पाळधी येथून अनेकांना ताब्यात घेऊन पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.
बीएचआर (BHR) पतसंस्थेचे आवसायक जितेंद्र कंडारे यानेच आवसानीत काढण्यात आलेल्या पतसंस्थेत मोठा गैरव्यवहार करुन भष्ट्राचार केला. त्यात त्याने अनेकांना त्यांचे ठेवीच्या 30 ते 40 टक्के पैसे देऊन त्यांना 100 टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेतले. आज पकडण्यात आलेल्यांनी बीआरएच पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या 30 ते 40 टक्के पैसे देऊन त्यांना 100 टक्के पैसे परत केल्याचे दाखविले व त्यातून आपले कर्ज परतफेड केल्याचे दाखविले होते.