पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी मनपा क्षेत्रामध्ये कोविड-19 च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालील प्रमाणे सुधारित आदेश निर्गमित केले आहेत.
खालील आदेश हा सोमवार (दि. 21 जून 2021) पासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे.
जाणून घ्या पिंपरी-चिंचवड शहरात काय सुरू अन् काय बंद –
* खालील नमूद आस्थापना / उपक्रम सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहणार आहे.
1. पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रामध्ये कोविड-19 च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी यापुर्वीचे दि. 5 जून 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा मधील नमूद दुकाने ही आठवडयातील सर्व दिवस सुरू राहणार आहेत.
2. अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. शनिवार व रविवार पुर्णतः बंद राहतील.
3. सार्वजनिक वाचनालये सुरू राहतील.
4. स्पर्धा परीक्षा क्लासेस / कोचिंग क्लासेस (Coaching classes) / अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था हॉलच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
5. मॉल 50 टक्के क्षमतेनुसार सुरू राहतील. मात्र सिनेमागृह, नाटयगृह संपुर्णतः बंद राहतील.
6. व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर हे आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार फक्त सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. मात्र सदर ठिकाणी वातानुकूल (एसी) सुविधा वापरता येणार नाही.
7. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्या संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरूस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहतील.
8. मद्य विक्रीचे दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहतील.
* रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. फक्त घरपोच सेवा रात्री 11 पर्यंत सुरू राहील. स्वतः जावून पार्सल आणणे बंद राहील. शनिवार व रविवार फक्त घरपोच सेवा रात्री 11 पर्यंत सुरू राहील. स्वतः जावून पार्सल आणणे बंद राहील.
* लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा यांच्या कर्मचार्यांना प्रवास करण्यास परवानगी राहील.
* पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी (उद्याने) खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवडयातील सर्व दिवस सकाळी 5 ते 9 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजपर्यंत सुरू राहील.
* पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड-19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
शासकीय कार्यालये (अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणार्या कार्यालयांव्यतिरिक्त अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी.
* सूट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील.
* सर्व आऊटडोअर स्पोर्ट्स हे आठवडयातील सर्व दिवस सुरू राहतील. तसेच इनडोअर स्पोर्ट्स सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सुरू राहतील.
* सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रमास 50 लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी 7 वाजेपर्यंत परवानगी राहील.
* लग्न समारंभ कार्यक्रम हे हॉलच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने जास्तीत जास्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
* अत्यंसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
* विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा या 50 टक्के उपस्थितीत घेणेस परवानगी राहील.
* पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रातील बांधकामे नियमितपणे सुरू राहतील.
* ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.
* पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी) प्रतिबंध राहील. तसेच रात्री 10 नंतर अत्यावश्यक कारण वगळता संचारबंदी लागू राहील