पुणे : भाच्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलास मोबाईल विक्रीच्या बहाण्याने पर्वती पायथा येथे बोलावून घेत त्याचा कोयत्याने वार करीत खून केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
वृषभ दत्तात्रेय रेणुसे (वय २३, रा. आंबेगाव पठार), सचिन ऊर्फ दादा प्रकाश पवार (वय १९, रा. जनता वसाहत) आणि आकाश उद्धव नवाडे (वय २१, रा. आंबेगाव पठार) असे कोठडी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सौरभ तानाजी वाघमारे (वय १७) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
या प्रकरणी दादासो मारुती बनसोडे (वय २३ रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पर्वती पायथा येथे रविवारी (ता. १३) रात्री हा प्रकार घडला होता. खूनाचा हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. गुन्ह्यांत वापरलेले हत्यारे, आरोपीचे कपडे जमा करणे आणि या गुन्ह्यांच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केली.
रेणुसे यांच्या मोबार्इलचा सीडीआर पोलिसांना मिळाला आहे. त्याच्या आधारे या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत. या गुन्ह्यात वापरलेले दोन कोयते पोलिसांनी पवार याच्याकडून जप्त केले आहेत. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे करीत आहेत.