पायी वारीची मागणी रास्त आहे, त्याचा सकारात्मक विचार करा : राज्यपाल

0

मुंबई : वारकरी संप्रदायाची मोजक्या संख्येत नियमांसह पायी वारीची मागणी रास्त असून परंपरा जोपासण्यासाठी सकारात्मक विचार करा, अशा सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना दिल्या. त्यानंतर तातडीने या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली.

पंढरपूरच्या पायी वारीच्या मागणीसाठी वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सोमवारी भेटल्यावर राज्यपालांनी याप्रकरणात थेट हस्तक्षेप करून मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दूरध्वनी करून सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली.

राज्य सरकारने यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर १० प्रमुख संतांच्या पादुका बसने नेण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्वीकारला असला तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. अनेक वारकरी संघटनांनी पायीच वारी करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सोमवारी भेट घेतली.

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आचार्य तुषार भोसले म्हणाले की, सरकारने निर्बंधांसह ५० वारकऱ्यांच्या पायी वारीला परवानगी द्यावी. आमच्या ज्ञानोबा-तुकोबांसह ५० वारकऱ्यांना सुरक्षा देणे राज्य सरकारला झेपत नसेल, तर त्यांनी केंद्राकडून सुरक्षा मिळवून पायी वारी करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.