10 पिस्तुल तसेच 12 मॅगझिन्स आणि 6 लाईव्ह राऊंड्स पोलिसांनी जप्त केले आहेत.गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड भागात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 7 चे प्रभारी मनीष श्रीधनकर यांच्या पथकाने सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं.
लखनसिंग चौहान (21).असं अटक केलेल्या युवकाचं नाव आहे. आरोपीवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीही गुन्हे शाखेने बंदुकीसह एकाला अटक केली होती. पण त्यावेळी तो पोलिसांच्या तावडीतून निसटला.
पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणी वेळी चौहान हा मध्य प्रदेशातील बरुवानी जिल्ह्यातील रहिवासी असून त्या जिल्ह्यात असे एक गाव आहे जिथे बहुतेक लोक शस्त्रे बनवण्याचे काम करतात, अशी माहिती पठाण यांना मिळाली. शस्त्रे बनवणे आणि वेगवेगळ्या राज्यात त्याची विक्री करणे हा चौहानचा कौटुंबिक व्यवसाय आहे.
पोलिसांना 10 पिस्तुल तसेच 12 मॅगझिन्स आणि 6 लाईव्ह राऊंड्स मिळाल्या आहेत. चौहानकडून पिस्तूल विकत घेणाऱ्यांची यादीही पोलिसांना मिळाली आहे. त्याने चौकशी दरम्यान सांगितले की, तो एक पिस्तूल ३० हजारांना विकत असे.
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, तो दरमहा 100 हून अधिक बंदूका बनवून मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात विक्री करत असे. दरम्यान, इतकी शस्त्रे विकायला तो कोणाकडे मुंबईकडे आला होता? याची गुन्हे शाखा चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.