गुन्हे शाखा युनिट पाचची मोठी कामगीरी; 95 तोळे सोन्याचे दागिने जप्त

0

पिंपरी : सराईत चोरट्यांच्या टोळीला अटक करुन त्यांच्याकडून तब्बल 47 लाख 50 हजार रुपयांचे 95 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. टोळीकडून दरोड्याचा एक आणि घरफोडीचे पाच असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

लिंग्या उर्फ अजित व्यकंप्पा पवार, आप्पा राम भोसले (40, रा. सिंदगाव ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) त्याची साथीदार पत्नी सारिका संतोष चौगुले उर्फ पायल आप्पा भोसले, अक्षय मंगेश शिंदे (22, रा. काजी तडमस, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर), अजय रिका उर्फ राहुल पवार (रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापुर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी घराच्या खिडक्यांचे गज कापून आत प्रवेश करून घरफोडी व चोरी करणाऱ्या टोळीपैकी एक आरोपी लिंग्या उर्फ अजित व्यकंप्पा पवार हा औरंगाबाद येथे नातेवाईकाकडे आश्रयास असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वेषांतर करून औरंगाबादमधील वाळुंज येथून त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्याच्याकडे चौकशी करून त्याने चोरी केलेले 33 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

आरोपी लिंग्या याला तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या गुन्ह्यात वर्ग करून अधिक तपास केला असता त्याने त्याच्या चार साथीदारांची नावे सांगितली. तसेच त्याच्याकडून आणखी 15 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

लिंग्या याचे साथीदार अक्कलकोट, सोलापूर, उस्मानाबाद, करमाळा येथील जंगल भागात लपुन छपून वास्तव्य करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांना मिळाली. त्यानुसार चार टिम तयार करून आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आल्या. पोलिसांनी अक्कलकोट परिसरात वेषांतर करून सतत चार दिवस वॉच ठेवून जंगलात लपुन छपुन वास्तव्य करणा-या आप्पा भोसले, त्याची पत्नी सारिका आणि अक्षय या तिघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांचा पाचवा साथीदार अजय याला देखील पोलिसांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.