नागपुर : 100 कोटी वसुली प्रकरणात चौकशी सुरु असलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकून झाडाझडती सुरू केली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे अनिल देशमुखांच्या घराबाहेर सकाळपासूच केंद्रीय पोलीस दलाचे सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत.
आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गुरूवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज ईडीनं अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. दरम्यान, अनिल देशमुख सध्या घरात नसून ते दौऱ्यावर असल्याचं कळत आहे. देशमुख कुटुंबीय घरात आहेत.
याआधी मे महिन्यात देखील अनिल देशमुखांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यात महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.