पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच ठिकाणी छापे मारून पोलिसांनी तब्बल सुमारे अडीच किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई चिखली, भोसरी, चिंचवड येथे प्रत्येकी एक तर हिंजवडी परिसरात दोन ठिकाणी करण्यात आली.
चिंचवड पोलिसांनी काकडे पार्क, गणेश विसर्जन घाटाजवळ सापळा लावून दोघांना अटक केली. वेदांत सतिष शेलार (20), शुभम विजय विटोळे (21, दोघे रा. केशवनगर, चिंचवडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 400 रुपये किमतीचा 30 ग्रॅम गांजा, 550 रुपये रोख रक्कम आणि 50 हजार रुपयांची एक दुचाकी असा एकूण 50 हजार 950 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
हिंजवडी परिसरात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यातील पहिली कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई बेंगलोर महामार्गावर केली. यामध्ये हरून बाबू खान (32, रा. बावधन. मूळ रा. राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 534 ग्रॅम वजनाचा गांजा, मोपेड दुचाकी, रोख रक्कम असा एकूण 58 हजार 650 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
हिंजवडी मधील दुसरी कारवाई गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी ननवरेवस्ती येथे केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी एक दुचाकी, 827 ग्रॅम गांजा असा 70 हजार 675 रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी शिवशंकर अंबिकाप्रसाद यादव (18), रामरक्षा धर्मराज पासवान (36, दोघे रा. ननवरेवस्ती, सुसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने चिखली मधील पूर्णानगर येथे कारवाई करत पाच हजार 800 रुपये किमतीचा 232 ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी समीर अमरसिंग बुडा (38, रा. चिखली) याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणी विरोधी पथकाने पीडब्ल्यूडी कॉलनी, दापोडी येथे कारवाई करून रोहन उत्तम कांबळे (19, रा. पिलाजी काटे चाळ, दापोडी) याला अटक केली. त्याच्याकडून 24 हजार 800 रुपये किमतीचा 865 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखली, भोसरी, चिंचवड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या पाच कारवायांमध्ये पोलिसांनी दोन लाख 10 हजार 875 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच दोन किलो 488 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.