मुंबई : ईडीने शुक्रवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर छापा मारुन झडती घेतली. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री देशमुख यांचे स्वीय सहाय्यकासह दोघांना अटक केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना अटक केली आहे. देशमुखांवर लाच घेतल्याचे आरोप झाले असून त्या प्रकरणात झालेली ही पहिली अटक आहे. ईडीने काल देशमुख यांच्या नागपूर GPO चौक येथील घरावर छापा मारला.
बर्खास्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेने बार मालकांकडून ४ कोटी रुपये गोळा केला व ते सर्व पैसे देशमुख यांच्याकडे दिले, असा ईडीचा आरोप आहे.
“हा सर्व पैसा शेल कंपन्यांमध्ये गुंतवून नंतर देशमुख कुटुंबाशी संबंधित कंपन्यांकडे वळवण्यात आला” असे सूत्रांनी सांगितले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी काल ईडीकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली. त्याचवेळी देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांची ईडीकडून कसून चौकशी सुरु होती.
एका चार कोटी रुपयांच्या प्रकरणात ही छापेमारीची कारवाई झाली होती. मुंबईतील १० बार मालकांनी अनिल देशमुख यांना तीन महिने चार कोटी रुपये दिल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे.