पुणे : ठेकेदाराकडे पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने रंगेहात पकडले. औंध परिसरात ही कारवाई करण्यात आली.
अजुहरद्दीन शेख (24, रा. पिंपरी चिंचवड, मूळ, पश्चिम बंगाल) आणि संतोष सुरेश देवकर (32, रा. शाहूनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. चतुःशृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता. समोरील व्यक्तीने त्यांना “पचास लाख रुपये दे नही तो ठोक दूंगा, कल तक पैसे तयार रखने का, मै जो बोल रहा हु वही सुनने का, पैसे का इंतजाम रखनेका, पोलीस को पता चला तो अंजाम जानता है. तेरा खानदान तो पुरा गया” अशा भाषेत 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
दरम्यान तक्रारदार यांनी खंडणी विरोधी पथकाकडे याबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला होता. आज पून्हा फिर्यादीला आरोपीचा खंडणीसाठी फोन आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला आणि खंडणीची रक्कम घेण्यासाठी औंध परिसरात आले असताना दोघांना पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी विनोद साळूखे, शैलेश सुर्वे, प्रदीप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, प्रवीण पडवळ, आशा कोळेकर, प्रदीप गाडे, संपत अवचरे, विजय गुरव, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, अमोल पिलाने, भूषण शेलार, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली आहे.