वाढदिवसाच्या शुभेच्छाचा फ्लेक्स; ‘आरबी’ ग्रुपच्या सदस्यांसह 15 जणांवर गुन्हा

0

पिंपरी : वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे फ्लेक्स लावल्याप्रकरणी ‘आरबी’ ग्रुपच्या सदस्यांसह 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिसांनी शुक्रवारी (दि. 25) ही कारवाई केली.

आरबी ग्रुपचे सदस्य रुद्रा भरणे, राहुल पवार, स्वप्नील कुंभार, अमित रानवडे, रोहित कोर्टे, केतन इंगवले, समीर मोरे, बापू जगताप, कुणाल मोकाशी, हरीश वाघमोडे, शिवा कांबळे, आकाश हेगडे, रोहन पवार, अवि गव्हाळे, विकास हेगडे (सर्व रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी गौतम सखाराम बाराते (वय 57) यांनी शुक्रवारी (दि. 25) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वाकड रोड, वाकड येथे शिव कॉलनीच्या कमानीजवळ सार्वजनिक रोडवर खड्डे खोदून महापालिकेची परवानगी न घेता वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा मोठा फ्लेक्स लावला. यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244 व महाराष्ट्र मालमत्ता विरुपन प्रतिबंधक कायदा 1995चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.