पुणे : सराईत गुन्हेगारास पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व एका जिवंत काडतुस ताब्यात घेतले आहे.
शिवम आनंत बरिदे (21, रा. खडकवासला ता. हवेली जि. पुणे) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक किरण कुसाळकर व महेंद्र कोरवी यांना शिवम बरिदे या सराईत गुन्हेगाराकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर खडकवासला परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून बरिदे यास ताब्यात घेतले.
त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस आढळून आले. आरोपी शिवम बरिदे यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवेली पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.