नवी दिल्ली : भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी चीनची घुसखोरी, करोना, राम मंदिर या मुद्द्यावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्यांच्या या टीकेनंतर विरोधकांच्या हाती आयता मुद्दा मिळाला आहे. तर २०२४ साली पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे.
“चीननं देशात घुसखोरी केल्यानंतर आपल्याला त्यांना सडेतोड उत्तर देणं गरजेचं होतं. गलवान, कैलाश रेंजमध्ये आपण करुन दाखवलं. मात्र पुन्हा एकदा चर्चेकडे वळलो. हे चर्चेचं गुऱ्हाळ मला समजत नाही. आपली जमीन आहे, आपल्या छातीवर बसले आहेत. त्यांच्य़ाशी चर्चा काय करायची. आपल्याला त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. चीनसोबत युद्ध करणं गरजेचं आहे. चीन जगासमोर आपल्याला दाबत असल्याचं दाखवत आहे. त्यात त्यांना यश मिळताना दिसत आहे.”, अशा शब्दात सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला खडसावलं.
”नरेंद्र मोदी स्वत: सांगतात, ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनी कोणत्याही पदावर राहू नये. वयोमानामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि शांताकुमार यांना बाजूला सारलं आहे. आता २०२४ मध्ये भाजपाचा चेहरा कोण असेल?, याबाबत त्यांनी खुलासा केला पाहीजे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला पाहीजे. कार्यकर्त्यांना विचारलं नाही, तर वाजपेयींसारखी परिस्थिती होईल”, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं. त्याचबरोबर २०२४ मध्ये भाजपाचंच सरकार येईल, हे देखील सांगायला ते विसरले नाही. असं त्यांनी ईटीव्ही भारताला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
जम्मू काश्मीरमधील नेत्यांची बैठकीही अमेरिकेच्या दबावात बोलवण्यात आल्याची टीका त्यांनी केली. तसेच करोनास्थितीवरुनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पहिल्या लाटेनंतर वाढलेल्या अहंकारामुळे दुसऱ्या लाटेत देशाचं नुकसान झालं. आता तिसरी लाट येणार असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
“देशात आणीबाणीसारखी स्थिती नाही. आम्ही मुक्तपणे फिरू शकतो. आम्हाला कुणीही तुरुंगात टाकत नाही. त्यावेळेस आम्हाला कोणताच अधिकार नव्हता. मी भाजपामध्ये आहे, मला कोणती गोष्ट आवडली नाही, तर मी टीका करु शकतो. मात्र काँग्रेसमध्ये आजही कुणी असं करु शकत नाही. आजची स्थिती आणीबाणीशी जोडणं चुकीचं ठरेल”, असं सांगितलं.