पुणे : फसवणूक प्रकरणात अटक असणाऱ्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांच्या जामिनाचा मंगळवारी निर्णय होणार आहे. आज न्यायालयात जामिनावर सुनावणी झाली.
येरवडा पोलीस ठाण्यात संजय होनराव (48) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लुंकड रियालिटी फर्मचे अमित लुंकड यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने त्यांना अटक केली होती. अटकेनंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान, त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.
आज न्यायालयात जामिनावर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील सुनील हांडे यांनी जमिनीला विरोध करताना ‘फसवणूकीचा आकडा वाढला आहे. फसवणूक झालेले व्यक्ती आता समोर येऊ लागले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर फसवणूक झालेल्या व्यक्तींना पैसे परत देण्यात येत आहेत.
मात्र, अद्यापही गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आता त्यांना जामीन दिला तर ते दबाव आणू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद केला. जामिनावर उद्या (मंगळवारी निर्णय) होणार आहे.