बांधकाम व्यवसायिक अमित लुंकड यांना जामीन

आठ दिवसात हमीपत्र सादर करण्याचे आदेश

0

पुणे : गुंतवणुकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांचे पैसे वेळेवर परत न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायीक अमित कांतीलाल लुंकड यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तीक जात मुचलक्या जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा आदेश दिला.

लुंकड यांच्यावर महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय विलास होनराव (वय. 48, रा. दत्तनगर, आंबेगाव) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. न्यायालयात झालेल्या दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर, न्यायालयाने लुंकड यांना आठ दिवसाच्या आत पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

महिन्यातून दोनदा येरवडा पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याबरोबरच जामीन झालेल्या दिवसापासून आठ दिवसांत लुंकड यांनी न्यायालयात हमीपत्र द्यावे, ज्या गुंतवणुकदारांची देणी अद्याप शिल्लक आहे आणि जे गुंतवणुकदार पुढे ही गुंतवणुक करू इच्छित नाही अशा सर्वांच्या रकमा परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लुंकड यांच्या वतीने अ‍ॅड. सुधीर शहा, अ‍ॅड. जितेंद्र सावंत, अ‍ॅड. राहुल भरेकर यांनी युक्तीवाद केला.

तर संपत्तीवर जप्ती येवून होणार लिलाव :
गुंतवणुकदारांनी मागणी केल्याप्रमाणे लुंकड यांनी गुंतवणुकदारांचे पैसे परत केले नाही तर त्यांच्या संपत्तीवर जप्ती आणून तिची विक्री करून गुंतवणुकदारांचे पैसे देण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आाले आहे. अशा परिस्थितीत लुंकड यांच्या घरच्यांनी संपत्तीबाबत कोणतेही अडथळे निर्माण न करता हक्क दाखवायचे नाहीत. तसेच  गुंतवणुकदारांनी मागितल्याप्रमाणे पैसे दिले नाही तर जामीन नामंजूर करण्यात येईल अशा कडक व अटी शर्ती हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण :
याबाबत दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, कल्याणीनगर येथील स्कॉय वन बिल्डिंगमधील कार्यालयात होनराव यांनी अमित लुंकड यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना तुम्ही गुंतविलेल्या रकमेवर प्रतिमहिना १५ टक्के परतावा देऊ, असे प्रलोभन दाखविले. त्यामुळे विश्वास ठेवत फिर्यादी यांनी लुंकड रिअ‍ॅलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या फर्ममध्ये वेळोवेळी पैसे भरून २१ लाख २६ हजार रुपयांची गुंतवणूक केली. दरम्यान, ठरल्याप्रमाणे गुंतविलेल्या रकमेवर प्रतिमहिना १५ टक्के परतावा न देता फिर्यादीची लुंकड यांनी फसवणूक केली म्हणून फिर्याद दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.