तोतया पोलिस अधिका-‍याची पोलिस कोठडीत रवानगी

0

पुणे : कस्टम विभागात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली ५१ लाख १७ हजार रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी तोतया पोलिसास फरासखाना पोलिसांनी एकास अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश आर. के. बाफना-भळगट यांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४३, रा. काळेपडळ, हडपसर) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या बाबत एका ज्येष्ठ कामगाराने फिर्याद दिली आहे. कसबा पेठ, मंगळवारपेठ परिसरात २०१७ ते मार्च २०२१ दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला.

शिंदे याने खाकी वर्दी परिधान करीत महाराष्ट्र पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी  फिर्यादी आणि त्यांच्या नातेवार्इकांकडे केली व त्यांच्या विश्वास संपादित केला. त्यानंतर कस्टम विभागात माझ्या ओळखी आहेत, असे बोलून महिला आरोपीच्या मदतीने फिर्यादीचा मुलगा, पुतण्या आणि भाचा यांना नोकरी लावून देतो असे सांगितले. त्याबदल्यात ५१ लाख १७ हजार ४०० रुपये घेत त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

अटक आरोपींकडून गुन्ह्यांतील रक्कम जप्त करण्यासाठी, गुन्ह्यांत आणखी कोणी साथीदार आहे का? तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या सहकारी महिलेस अटक करण्यासाठी तसेच आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? याचा तपास करण्यासाठी त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.