सामाजिक सुरक्षा पथकाचे प्रमुख अचानक बदलले
सहाय्यक पोलीस निरीक्षकाची नियुक्ती, पोलीस खात्यात तर्कवितर्क
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या सामाजिक सुरक्षा पथकाच्या प्रमुखपदी बदल करण्यात आले आहेत. यामुळे पोलीस वर्तुळात तर्कवितर्क सुरु झाले असून चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षकांकडे असणारा पदभार काढून पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडे सोपविला आहे. तसेच पोलीस आयुक्त वाचक म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पुणे शहर आणि पुणे ग्रामीणचा भाग कमी करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन झाले. आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी यासाठी पहिल्या दिवसांपासून पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची धावपळ सुरु होती. अनेकांनी चांगली पोस्टिंगही पदरात पाडून घेतली.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर कृष्ण प्रकाश यांनी अनेक बदल करण्यास सुरुवात केली. सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करुन शहरातील अवैध धंद्यावर कडक कारवाई सुरु केली. अवैध धंद्यावाल्यांना सळो की पळो करुन सोडले. या पथकाच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांची नियुक्ती केली. या पथकाने शहरात जोरात काम केले.
काही महिन्यापूर्वी पोलीस आयुक्तांनी या पथकाकातील पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली. याचे कारण नक्की अद्याप समोर आले नाही. मात्र याही वेळी पोलीस खात्यात मोठी चर्चा रंगली होती. सध्या सामाजिक पथकाचे काम जोरात सुरु असताना अचानक या पथकाच्या प्रमुखपदी बदल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक मारुती डोंगरे यांची पुढील आदेशापर्यत तात्पुरत्या स्वरूपात प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच डोंगरे यांना पोलीस आयुक्त वाचक म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या या आदेशामुळे पोलीस दलात मोठी चर्चा सुरु झाली आहे. पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या बाबत अद्याप कोणताही आदेश झालेला नाही.