पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ‘रिअल इस्टेट किंग’ अविनाश भोसले यांना ईडीने समन्स बजावले आहे. आज (गुरुवार 1 जुलै) रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अविनाश भोसलेंना समन्स बजावले आहे. भोसले अंमलबजावणी संचलनालय कार्यालयात चौकशीला हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यालाही ईडीने समन्स बजावले आहे. अमित भोसलेला उद्या (शुक्रवार 2 जुलै) रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश आहेत. पुण्यातील एका जमिनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे. ही जमीन सरकारी असल्यामुळे याबाबत पुण्यात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईडीने गुन्हा रद्द करावा यासाठी अविनाश भोसले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर हायकोर्टानेही अविनाश भोसले यांना चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई हायकोर्टाकडून कोणतीही सवलत न मिळाल्याने अविनाश भोसले यांना ईडीच्या चौकशीला समोर जावं लागत आहे.