जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार : अजित पवार

0

मुंबई : ‘सातारा जिह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची विक्री झाली आहे. मागच्या सरकारच्या काळात त्याची सीआयडी चौकशी झाली. ‘एसीबी’नेही चौकशी केली होती. काहीही निष्पन्न झालं नाही. आता ‘ईडी’ने सुरू केलेली चौकशी ही ‘गुरू कमोडिटीज् ट्रेडर्स’शी संबंधित आहे. ईडीने आता कोणत्या आधारे चौकशी सुरू केलीय माहीत नाही. या कारवाईला कारखान्याचं व्यवस्थापन न्यायालयात आव्हान देईल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

‘ईडी’ने जरंडेश्वर साखर कारखान्यावर आणलेली जप्ती आणि त्या अनुषंगाने जोडल्या जाणाऱया संबंधाबद्दल अजित पवार यांनी उत्तर देत आरोप फेटाळून लावले. अजित पवार म्हणाले, ‘राज्य सहकारी बँकेने उच्च न्यायालयाच्या आदेशावरून 14 साखर कारखान्यांची विक्री केली. या प्रकरणांमध्ये चौकशा झाल्या. त्यामध्ये काहीही निष्पन्न झालं नाही. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा त्यांपैकी सर्वाधिक 65 कोटी 75 लाख रुपयांना विकला गेला. काही कारखाने तर केवळ चार कोटी रुपयांना विकले गेले. सर्वच काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी या राजकीय पक्षांचे नेते आणि खासगी व्यक्तींनी हे कारखाने विकत घेतले,’ असेही त्यांनी निदर्शनास आणले.

अजित पवार म्हणाले, ‘गुरू कमोडिटीज्ने विकत घेऊन जरंडेश्वर शुगर मिल या पंपनीमार्फत तो सुरू केला. त्यानंतर ‘बीव्हीजी ग्रुप’ने तो चालविण्यास घेतला. तेव्हा पहिल्याच हंगामात त्यांना तीन ते चार कोटी रुपये तोटा झाला. त्यानंतर माझे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांनी तो भाडेपट्टय़ाने चालवायला घेतला. त्यांनाही सुरुवातीला तोटा झाला. कारखान्याचं विस्तारीकरण आणि अनुषंगिक प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांचं कर्ज या पंपनीने काढलं आहे.’

‘ईडीने सुरू केलेली चौकशी ही ‘गुरू कमोडिटीज् ट्रेडर्स’शी संबंधित असल्याने कारखान्यावर टाच आणली. सरकारच्या एखाद्या एजन्सीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता ईडीने सुरू केलेली चौकशी गुरू कमोडिटीज्संदर्भात आहे. ‘जरंडेश्वर शुगर मिल’ ही वेगळी कंपनी आहे. त्याविरोधात ज्यांच्याकडे अपील करायचं आहे तिथे व्यवस्थापन ते करेल,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.