अनिल देशमुखांच्या मुलाला ईडीचे समन्स

0

मुंबई : 100 कोटी वसुली प्रकरणानंतर राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या मागे ईडीची ससेमिरा लागली आहे. आता देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने समन्स पाठवलं आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलंय. त्यांना मंगळवारी (6 जुलै रोजी) चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आलंय. ऋषिकेश देशमुख यांना पाठवण्यात आलेलं हे पहिलं समन्स आहे.

अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ ऋषिकेश देशमुख यांनाही समन्स आल्यानं चर्चांना उधाण आलंय. अनिल देशमुख यांना समन्स पाठवण्यात आल्यानंतर आता ऋषिकेश देशमुख यांना समन्स पाठवण्यात आल्यानं पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

दोघांना वेगवेगळ्या तारखांचं समन्स बजावण्यात आलंय. ऋषिकेश देशमुख यांना 6 जुलै, तर अनिल देशमुख यांना 5 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स आहे.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “ईडीच्या तपासात सचिन वाझे याच्याकडून आलेला पैसा संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याकडे जायचा. त्यानंतर तो वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत ऋषिकेश देशमुख यांच्या कंपन्या आणि ट्रस्टमध्ये आल्याचं समोर आलंय. त्यामुळे या मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात ऋषिकेश देशमुख याचा हात असल्याचं स्पष्ट झालंय. त्याचमुळे त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे.”

ईडीने शनिवारी (25 जून) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह पाच ठिकाणी छापा टाकला होता. यानंतर काल दुपारी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खाजगी सहायक कुंदन शिंदे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्यांची 10 तास चौकशी केल्यानंतर रात्री साडेबारा वाजता दोघांना अटक करण्यात आली. यानंतर अनिल देशमुख यांना तात्काळ चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितली.

Leave A Reply

Your email address will not be published.