अधिवेशनाचा पहिला दिवस; या मुद्यांवर गाजणार

0

मुंबई : महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सकाळी 11 वाजता सुरू होत आहे. अवघ्या दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक पवित्रा घेत सरकारची कोंडी करतील, असं समजतं. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची शक्यता जवळपास कमी असल्याने लक्षवेधी तारांकित प्रश्न -उत्तरेदेखील नसणार आहेत. यामुळे विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतील.

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था, सध्याच्या कोरोना संकटात लोकांचे झालेले हाल मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले आहे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्य सरकारची कोंडी विरोधक करतील. तर दुसरीकडे ED च्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून तिसरे समन्स मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी देशमुख प्रयत्न करत आहेत. देशमुख यांच्या मुद्द्यावरूनदेखील विधिमंडळामध्ये पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

आज विधानसभा सत्रामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन 2021-22 च्या पुरवणी भागाच्या मागण्या सादर केल्या जाणार आहेत. तसेच वेगवेगळ्या विभागांची कागदपत्रं सभागृहाच्या पटलावर सादर केली जातील. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेच्या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या चौकशीच्या समितीला पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिनांकापर्यंत वेळ वाढवून देण्यात यावा, अशा स्वरूपाचा प्रस्तावदेखील आज मांडण्यात येणार आहे. विधानसभेचे सदस्य राहिलेले रावसाहेब अंतापुरकर, राज्यसभेचे विद्यमान सदस्य आणि माजी विधानसभा सदस्य राजू सातव, माजी मंत्री संजय देवतळे, रामप्रसाद बोराडे, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या दुःखद निधनाबद्दलही सभागृहामध्ये शोकप्रस्ताव असेल.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज सकाळी दहाच्या आसपास विधिमंडळ काँग्रेस कार्यालयाची बैठक होणार असून या बैठकीकडे लक्ष लागलं आहे. काँग्रेस आता स्वतःच्या भूमिकेवरून मागे हटणार की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावणार याकडे लक्ष आहे. तूर्तास तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता जवळपास संपली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.