पुणे : पुणे शहर पोलिस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असणार्या महिला पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
श्रध्दा शिवाजीराव जायभाये (28, सध्या रा. कावेरीनगर पोलिस लाईन, बिल्डींग नं. 21, रूम नं. 4, वाकड, पुणे. मुळ रा. शेगाव) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिस कर्मचार्याचे नाव आहे. श्रध्दा जायभाये या विवाहीत असून त्यांचे पती नेवीमध्ये नोकरीस आहेत. सध्या त्यांची पोस्टींग केरळमध्ये आहे. श्रध्दा आणि शिवाजी यांना एक लहान मुलगी (वय 2 ते 4 वर्षा दरम्यान) आहे. दरम्यान, श्रध्दा यांची आज साप्ताहिक सुट्टी होती. काल (रविवार) रात्री त्यांनी त्यांच्या मुलीला नातेवाईकांकडे सोडले होते.
श्रध्दा यांचा मोबाईल लागत नसल्याने त्यांच्या एका मैत्रीणीने वाडक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. वाकड पोलिस पोलिस लाईन येथे पोहचले असता जायभाये यांचा दरवाजा बंद दिसला. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर श्रध्दाने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. उपायुक्त भोईटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगळीकर यांच्यासह इतर पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली.