मुंबई : अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पलांडे आणि देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे यांच्या जबाबाच्या आधारावर निलंबित सचिन सचिन वाझेचे स्टेटमेंट नोंदविण्यासाठी विशेष NIA कोर्टात याचिका करण्यात आल्याची माहिती ईडीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिली.
या याचिकेवर एनआयए कोर्टाकडून गुरुवारी सुनावणी होणार आहे. ईडीने यापूर्वीही वाझेचा जबाब नोंदवून घेतला होता. याचिकेतील महत्त्वाची बाब म्हणजे, अनिल देशमुखांच्या वतीने कुंदन शिंदे हेच वाझेकडून वसुलीची रोकड घेत असत असा दावा ईडीने केला आहे.
मुंबईतील ‘ऑर्केस्ट्रा बार’ मालकांकडून पैसे गोळा करण्यासाठी आणि शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी पालंडे यांनी वाझे, डीसीपी राजू भुजबळ आणि एसीपी संजय पाटील यांच्याशी समन्वय साधला असल्याचा आरोप ईडीने केला आहे. डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान वाझेने ४.७ कोटी रुपये जमा केले होते आणि ती रक्कम शिंदे यांच्याकडे दिली होती, असाही आरोप पलांडे यांच्यावर करण्यात आला आहे.
“शिंदे हे महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वतीने वाझेकडून रोख रक्कम गोळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन पोलिस अधिकाऱ्यांकडून याबाबत जबाब नोंदविण्यात आला असून वाझेच्या जबाबाची पुष्टीही करण्यात आली आहे”, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.