स्मार्ट सिटीतील कंपनीच्या घोटाळ्याची तक्रार ‘ईडी’कडे करणार : संजय राऊत
आमदार गुंतले ठेकेदारीत, महापालिकेत जनतेच्या पैशांची लूट
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकांच्या वेळी देण्यात आलेल्या शहरातील भय आणि भ्रष्टाचाराच्या घोषणा घोषणाच राहिल्या आहेत. शहरातील आमदारांसह इथले सगळे प्रमुख लोक महापालिकेतील ठेकेदारीमध्ये गुंतले आहेत. महापालिकेत जनतेच्या पैशांची घाणेरड्या पद्धतीने लूट होत असल्याचा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पिंपरी येथे केला.
पालिकेतील भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणे मंत्रालयापर्यंत पोहोचली आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांचे कुटूंबीय संचालक असलेल्या स्मार्ट सिटीतील कंपनीच्या घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना नेते, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज (शुक्रवारी) आकुर्डीत तीनही विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिका-यांचा मेळावा झाला. त्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार व उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड महापालिकेत जनतेच्या पैशांची घाणेरड्या पद्धतीने लूट होत आहे. मुंबईत बसलेल्या भाजपच्या प्रमुख नेत्यांनी यावर मत व्यक्त केले पाहिजे. दुस-यांवर जसे बोलतात. तसे यावर बोलणे देखील गरजेचे आहे. त्यांना स्वत:वरील टीका सहन होत नाही. सत्य सहन होत नाही. याला राजकारण म्हणत नाही.
महापालिकेतील भ्रष्टाराची सगळी प्रकरणे मंत्रालयापर्यंत पोहोचली आहेत. स्मार्ट सिटीतील भाजप आमदार प्रसाद लाड यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून सुलभा उबाळे यांनी हा प्रकार उघडकीला आणला. हे गंभीर प्रकरण आहे. इथे ईडी किंवा सीबीआय का जात नाही, हा प्रश्न आम्हाला पडला आहे”.
”स्मार्ट सिटीची कामे घेणा-या कंपनीत कोणाचे कुटुंबीय संचालक आहेत, याबाबतची सगळी कागदपत्रे ईडीला पाठविणार आहोत. असे तपास हल्ली राज्य सरकार करत नाही. ईडी करते. ईडीकडे माहिती नसेल तर आम्ही पाठवून देवू. महापालिकेतील प्रकरणे आता बाहेर येत आहे. कोरोना काळात चौकशा केल्या नाहीत. आता प्रकरणे बाहेर येत असून चौकशा केल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यहार, जनतेच्या पैशांची लूट सहन करणार नाहीत”, असेही राऊत म्हणाले.