ईडीकडे फक्त आमच्याच नेत्यांचे पत्ते आहेत का ? : संजय राऊत

0

पुणे :  राज्यात फक्त महाआघाडीच्या नेत्यांची ईडीकडून चौकशी, कारवाई होत आहे. ईडीकडे फक्त आमच्याच नेत्यांचे पत्ते आहेत का? आमच्याकडेही त्यांचे पत्ते आहेत. ते आम्ही चौकशीसाठी देऊ, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप वर निशाणा साधला आहे.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा आढावा बैठकीसाठी संजय राऊत आज पिंपरी चिंचवड मध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. इथं पण अनेक घोटाळे आहेत. पण इथं ईडी किंवा सीबीआय का जात नाही. की फक्त यांच्याकडे खडसे, देशमुख, सरनाईक यांचेच पत्ते आहेत. भाजपवाल्यांचे पत्ते नाहीत का? आम्ही पण ह्यांचे पत्ते देऊ, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, भाजपची ताकद जास्त दिसत आहे ती सूज आहे. उद्या काय होईल, भाजपचे अनेक राष्ट्रवादीत किंवा दुसऱ्या पक्षात जातील, हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे. इथले सगळे भाजपवाले ठेकेदारीत गुंतलेले आहेत. हा आमचा धंदा नाही, म्हणून अबाधितपणे मुंबईत आहोत, असं ते म्हणाले.

सहकार खातं केंद्रात काढून काही कार्यक्रम करायचा विचार असेल तर आम्हीही कार्यक्रम करू. खरं तर सहकार हा राज्याचा विषय पण तो केंद्राशी जोडला आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी केवळ केंद्रात सहकार खातं  निर्माण केलंय का? तर मग हा परत एक सत्येचा गैरवापर आहे, असं राऊत म्हणाले.

राणें मंत्रीपदावर बोलताना ते म्हणाले की, राणे मुख्यमंत्री राहिलेत, अनेक पद भूषवली, त्यांची राजकीय गरुड झेप पाहिली आहे. हे पाहता त्यांना मिळालेलं खातं कमकुवत आहे. मोठं खातं मिळालं असतं तर महाराष्ट्र म्हणून गौरव वाटला असता. ते चांगलं कार्य करतील असा विश्वास आहे असंही राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.