पुणे : पुणे शहरातील दुकाने दुपारी ४ नंतर पूर्णतः बंद झाले पाहिजे असा आदेश पोलिसांना आणि प्रशासनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. आणि जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.राज्य सरकारकडून शनिवार आणि रविवारबाबत जे काही निर्णय झाले आहे ते तसेच लागू असतील असेही स्पष्ट केले आहे.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा मागच्या आठवड्यात ६.२ होता. तो या आठवड्यात ६ टक्क्यांवर आला आहे. तसेच शहरातील मृत्यूदर देखील कमी झालेला आहे.
दोन्हीही लसीकरणाचे टप्पे पूर्ण झाले असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर देखील गर्दी होण्याचे प्रमाण वाढले आहे असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. कोरोनाबाधितांचे प्रमाण शहर, ४.९, पिंपरी ५ टक्के आणि पुणे ग्रामीण भागात ७.३ टक्के असून मृत्युदर हा पुणे- १.९ ,पिंपरी- ०.६ आणि पुणे ग्रामीणचा- ०.७ आहे.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा अशा ठिकाणी आपण ५० लाखांपर्यंत लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. मात्र, ज्या प्रमाणात लसीकरण पुरवठा व्हायला हवा होता. तो झालेला नाही. त्यामुळे लसीकरण ज्या वेगाने पूर्ण व्हायला हवे होते ते झाले नाही. तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासोबतच पुणे शहरातील निर्बंध कायम ठेवण्यात आले असल्याची माहिती करा असेही त्यांनी सांगितले आहे.
ऑक्सिजन, फायर ऑडिटला निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्युकरमायकोसिस रुग्ण कमी होत आहे. मृत्यूदर सुद्धा कमी झाला आहे असल्याची माहिती देखील पवारांनी दिली आहे.
राज्य शासनापाठोपाठ महापालिकेनेही नवीन आदेश काढत पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणारी सर्व दुकाने दुपारी चारपर्यंत उघडी राहणार आहेत. तसेच अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरु असणार आहे. मात्र, ही दुकाने शनिवार व रविवार पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तर, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंदच राहणार आहेत.
रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट – सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहे. तर, दुपारी चारनंतर तसेच शनिवार व रविवार रात्री११ वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा देता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, खुली मैदाने ही केवळ चालणे व सायकलिंगसाठी आठवड्यातील सर्व दिवस सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरु आहेत.
सकाळी ५ ते ९ या वेळेत आऊटडोअर खेळ खेळता येऊ शकणार आहेत. तसेच व्यायामशाळाही पाच दिवस सुरू आहेत . ई-कॉमर्स, कृषी संबंधी सर्व सेवा-व्यवसाय सुरू ठेवता आहेत. संध्याकाळी पाचनंतर मात्र जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे.