भूतबाधा झाल्याचे सांगून मावशीकडून ३५ हजार रुपये उकळले कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही दिली, दोघांना कोठडी
पुणे : घरात भूत असून त्याचा बंदोबस्त न केल्याच पौर्णिमेच्या आत तुमचा मृत्यू होईल, अशी भीती दाखवून मावशीकडून ३५ हजार रुपये उकळणा-या बहिणीच्या मुलासह त्याचा मित्राला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी देखील होती.
गौरव गणपत भोईर (वय १९, रा. नेवासा फाटा, अहमदनगर) आणि तुषार ऊर्फ तुषार मोहन दोडके (वय २२, रा. वारजे झोपडपट्टी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांची १२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या बाबत ४० वर्षीय महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौरव हा फिर्यादी यांच्या बहिणीचा मुलगा आहे.
१९ जून ते १ जुलै २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणात, गौरव याचा मित्र असलेला अॅशली जोसेफ याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वर्षापासून बरे वाटत नसल्याने फिर्यादी यांनी गौरवला सांगितले होते.
त्यानंतर गौरव याने त्याचे मित्र तुषार व अॅशले जोसेफ याला फिर्यादी यांच्या घरी बोलावले. त्या दोघांनी घरात भूत असून पौर्णिमेच्या आत तुमचा मृत्यू होईल, असे फिर्यादी यांना सांगितले. यावेळी, अॅशली व तुषार यांनी फिर्यादी यांना हॉलमध्ये बसवून आजूबाजूला हळद व कुंकू टाकले. त्यानंतर, तुषार याने पट्ट्याने मारहाण केली तर अॅशली याने लिंबू उतरवले व अगरबत्ती पेटवून जिभेला व ओठांना चटके दिले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादींकडून ३५ हजार रुपये घेतले.
त्यानंतरही अॅशली याने फिर्यादी यांकडे वारंवार पैशांची मागणी केली. एक जुलै रोजी ॲशली हा फिर्यादी यांच्या घरी गेला व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून एक हजार रुपये घेतले. त्यासह परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींची पोलिस कोठडी संपत असल्याने त्यांना शनिवारी (ता. १०) न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली होती