मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना लुटणारी टोळी गजाआड

0
पुणे : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या एका टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोरबेवाडी ( ता.खालापूर, जि.रायगड) चौकातून शनिवारी (ता. १०) अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.
गणेश हरिभाऊ वाघमारे (२८)आणि त्याचा साथीदार संतोष उर्फ मंगल्या वाघमारे (२१, दोघेही रा. मोरबेवाडी चौक मोरबेवाडी ता. खालापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्सप्रेस राष्ट्रीय महामार्गावर ताजे पेट्रोल पंपाजवळ दुर्गाप्रसाद जगत कहर (२७, रा.उत्तरप्रदेश) हा ट्रकचालक १२ जूनला झोपला होता.
मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारस सदर ठिकाणी चार अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी कहर यांना मारहाण करून त्यांच्या गाडीच्या कप्प्यातील ७० हजार रोकड जबरदस्तीने काढून घेऊन तेथून पसार झाले. याप्रकरणी कहर यांनी कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सदर गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हे हे खालापूर येथील एक टोळी करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी मोरबेवाडी चौकात (ता. खालापूर) सापळा रचून गणेश वाघमारे आणि त्याचा साथीदार संतोष उर्फ मंगल्या वाघमारे याला अटक केली.
पोलिसांनी आरोपींची अधिक चौकशी केली असता, संतोष उर्फ मलिक मारुती हिलम (रा.रामवाडी ता.खालापूर), रोहिदास जाधव (रा.वरोसे वाडी ता.खालापूर) आणि राकेश वारे रा.परळी ता.सुधागड जि.रायगड) हे आरोपींचे साथीदार असून त्यांनी एकत्रितपणे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, आरोपी गणेश वाघमारे, संतोष उर्फ मंगल्या वाघमारे, संतोष उर्फ मलिक हिलम, रोहिदास जाधव आणि राकेश वारे हे पाचही अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर कामशेत, खालापूर, तळेगाव दाभाडे,खोपोली, लोणावळा आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, गंभीर दुखापतीसह मारामारी असे १४ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, लोणावळ्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी नवनीत कॉवत , स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फैजदार शब्बीर पठाण,सुनील जावळे, काशीनाथ राजापूरे, मुकुंद अय्याचित, सचिन गायकवाड , प्रकाश वाघमारे आणि बाळासाहेब खडके यांच्या पथकाने केली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.