एक्स-रे प्लेटस चोरणा-याल्या दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

0

पुणे  : एक्स-रे काढण्यासाठी आवश्यक असलेल्या ४ एक्स-रे प्लेटस चोरणा-याला न्यायालयाने दोन वर्षे साधा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी हा निकाल दिला.

 

महम्मद अली इस्माईल शेख (वय ५९, मूळ रा. चेन्नई) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत डॉ. अनंत एकनाथ बागूल (वय ५६) यांनी याबाबत फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. १० ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या दरम्यान कसबा पेठेमधील युनिर्व्हसल रुग्णालयात ही चोरी झाली होती.

 

रुग्णालयातील एक्स-रे विभागामध्ये एक्स-रे काढण्यासाठी गरजेच्या असलेल्या ग्रे रंगाच्या वेगवेगळ्या आकाराच्या चार एक्स-रे प्लेट्स ठेवण्यात आल्या होत्या. या चोरीला गेल्याची फिर्याद देण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून शेख याला अटक केली. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुरेख क्षीरसागर यांनी पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उप-निरीक्षक लोखंडे यांनी काम पाहिले.

 

पोलीस हवालदार एस. एस. नाईक यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १ महिना साधा कारावास भोगावा लागेल, असे ही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.