पुणे : फ्लॅट बुक करीत त्यासाठी मोजलेले ८ लाख ६८ हजार रुपये देवूनही संबंधित सदनिका बिल्डरने परस्पर भलत्याच व्यक्तीला विकली. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी एका बिल्डरला अटक केली आहे.
महेश रामचंद्र तिखे (वय ५७, रा. बावधन) असे अटक करण्यात आलेल्या बिल्डरचे नाव आहे. त्याने अशाच प्रकारचे सुमारे सहा गुन्हे केल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. याबाबत नितीन शांताराम यादव (वय ३८, रा. आर. एम. डी कॉलेज जवळ, मुंबर्इ-बंगळूर हायवे) यांनी फिर्याद दिली आहे. पाच जानेवारी २०११ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत शिवणे परिसरात ही घटना घडली.
फिर्यादी यांनी तिखे याच्या शिवणे येथील भगवंतरी या गृहप्रकल्पात दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट बुक केला होता. बुकिंग झाल्यानंतर गुन्हा दाखल होर्इपर्यंत त्यांनी वेळोवेळी ८ लाख ६८ हजार ५२८ रुपये बिल्डरला दिले. मात्र रक्कम भरून देखील बिल्डरने करार करून दिला नाही. उलट फिर्यादी यांनी बुक केलेली सदनिका परस्पर दुसऱ्याला विकून फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तिखे याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
उत्तमनगर पोलिस ठाण्यात अशा प्रकारच्या सुमारे सहा तक्रारी दाखल आहेत. बुकिंग वेळी दिलेल्या पावतीचे मूळ पुस्तक जप्त करण्यासाठी, गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यासाठी, फिर्यादीने बुक केलेली सदनिका दुसऱ्या कोणाला विकली?, त्या सदनिकेचे कागदपत्रे कोठे तयार करण्यात आली?, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का?, याचा तपास करण्यासाठी तिखे याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने तिखे याला २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) एस. जी. बोत्रे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.