मुंबई : माजी मुंबई पोलीस आयुक्त आर. डी. त्यागी यांचा मुलगा राज त्यागी याला पश्चिम उपनगरात वांद्रे येथे आपल्या पत्नीचा पाठलाग करणे आणि धमकावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
राज त्यागी नुकताच घरगुती हिंसाचार प्रकरणात जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्यापासून वेगळे राहणाऱ्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी राज त्यागीला अटक केली. ही महिला आपल्या चार मुलांसह वांद्रे (पश्चिम) येथे राहते.
फिर्यादीत त्यागीच्या पत्नीने असा आरोप केला, की तो वांद्रे येथील तिच्या घराजवळ उभा होता आणि गाडीसह पाठलाग करत होता. एका सुरक्षारक्षकाने त्यागीला इमारतीच्या खाली उभे असलेले पाहिले होते, असे त्यागीच्या पत्नीने सांगितले.
तक्रारीच्या आधारे त्यागीविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. अटकेनंतर त्यागी यांना वांद्रे येथील न्यायालयात हजर केले असता, त्याला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
गेल्या वर्षी त्यागीच्या पत्नीने त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. राज त्यागीने वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करणार नाही, असे सांगितल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात त्याला काही अटींसह जामीन मंजूर केला होता.