लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ रात्री दरड कोसळल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूकीचा खोळंबा झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरड तात्काळ युद्धपातळीवर जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून, पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन लेनवरून सुरू करण्यात आली आहे.
दरड कोसळल्याची माहिती कळताच दस्तुरी बोरघाट महामार्ग पोलीस खोपोली पोलीस रस्ते विकास महामंडळ देवदूत आपत्कालीन पथक आणि आयआरबी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वर मिसिंग लिंक व बोगद्याचे काम सुरू आहे. यासाठी खंडाळा घाटातील खोपोलीजवळ उड्डाणपुलासाठी रस्ता रुंदीकरण आणि पुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड व राडारोडा मार्गावर मोठ्या प्रमाणात मध्यरात्री कोसळला होता. सध्या धोकादायक दरडीचा भाग हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.