मुंबई : मान्सून राज्यात सक्रीय झाला असून कोकणात पावसानं थैमान घातलं आहे. अतिवृष्टीमुळे कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक भागात पुरसदृस्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणातील गावांमध्ये सोडण्यात येणारा कोयनेचा विसर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोयनेतून विजनिर्मीती तात्पुरती बंद केली आहे.
पुराची परिस्थिती असताना पुन्हा कोयनेच्या पाण्याची भर नको, म्हणून राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर हा निर्णय घेण्यात आहे. यामुळे कोकणात पूरपरिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येण्यास मदत होईल.
कोकणातील पूरपरिस्थिती पाहता कोयना विजनिर्मितीनंतर कोकणात सोडण्यात येणार पाणी बंद करण्यात आलं आहे. पुढील तीन दिवसांच्या पावसाचा अंदाज पाहता कोकण आणि कोल्हापूर, सांगलीत प्रशासन सज्ज करण्यात आलं आहे, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
पूराने चिपळूण शहराला पाण्याचा वेढा कोकणात परिस्थिती चिंताजनक झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पूराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास 5 हजार लोक अडकून पडले आहे. चिपळूण शहरात पूराची परिस्थिती निर्माण झाल्याने 2005 ची पुनरावृत्ती होते की काय याची भीती निर्माण झाली आहे.