पिंपरी : कायद्या आणि पोलीस यांच्या समोर कोणालाही सुटका नाही या म्हणीप्रमाणे पिंपरी चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने कामगिरी केली आहे. खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आणि नाव बदलून गेली 13 वर्षे राजरोसपणे शहरात वावरणाऱ्या गुन्हेगारास अटक केली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील इतर आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा न्यायाधीशांनी सुनावली आहे.
पिंट्या उर्फ हनुमंत महादेव चव्हाण (रा. विद्यानगर, चिंचवड) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी पोलीस ठाणे गु.र.नं. 430/2008 भादवि 302, राईट मधील आरोपी गुलाब झोबाडे व त्याचे इतर तीन साथीदार यांना न्यायालयाने 18 /04/ 2012 रोजी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यातील पाहिजे असणारा आरोपी नामे पिंट्या उर्फ हनुमंत महादेव चव्हाण याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.
पिंट्या हा अमित महादेव पाटील (औरंगाबाद) या बनावट नावाने वावरत असून तो सुरत, गोवा, अहमदाबाद, कराड, सातारा, औरंगाबाद या शहरात वास्तव करत असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून बनावट दोन आधारकार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, बँक पासबुक आदी कागदपत्रे जप्त केली आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर, पथक प्रमुख हरिष माने, अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गणेश मेदगे, विजय तेलेवर, रामदास मोहिते, प्रमोद गर्जे शुभम कदम या पथकाने केली आहे.