सहा महिन्यात ‘रियल इस्टेट’ला तेजी येणार

0
मुंबई: कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था ढासळली होती, मात्र ती हळूहळू रुळावर येत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या बांधकाम उद्योगातही धुगधुगी निर्माण झाली असून येत्या काही दिवसांमध्ये हा व्यवसाय पूर्ण गती पकडेल, असा अंदाज नाईट फ्रँक, फिक्की आणि नारडेको यासारख्या संस्थांनी वर्तविला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बांधकाम साहित्याचा पुरवठा ठप्प झाल्याने आणि अनेक मजूर गावी निघून गेल्याने या क्षेत्राला मोठा फटका बसला. नाईट फ्रँक-नारडेकोच्या रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्स या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली. या सर्वेक्षणानुसार, जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत एप्रिल-जून तिमाहीत सेंटिमेंट स्कोर 57 टक्क्यांवरून 35 टक्क्यांवर आला. गेल्यावर्षी एप्रिल-जून तिमाहीत तर हा सेंटिमेंट स्कोर 22 टक्के इतका होता. त्या तुलनेत आताची परिस्थिती बरीच चांगली आहे. मात्र, आगामी काळात हे चित्र वेगाने बदलेल. लोक पुन्हा घर खरेदीला सुरुवात करतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असताना आणि अर्थव्यवस्था आक्रसलेली असताना मुंबईत मात्र नव्या मालमत्तांची खरेदी जोरात सुरु असल्याचे दिसून आले होते. कारण, मे महिन्यात मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात (MMRA) तब्बल 11 हजार कोटींची मालमत्ता विक्री व्यवहार झाल्याचे समोर आले होते.
30 मे 2021 रोजी सीआरई मॅट्रिक्स प्रॉपर्टी ट्रॅकर आणि आयजीआर महाराष्ट्र कडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मे 2021 मध्ये मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद रु. 10979 कोटी इतकी तर एप्रिल 2021 मध्ये रु. 22,507 कोटी इतकी झाली. मार्च 2021, फेब्रुवारी 2021 आणि जानेवारी 2021 मध्ये एमएमआर मध्ये नोंदणीकृत मालमत्ता विक्रीचे व्यवहार अनुक्रमे रू. 44167 कोटी, रु. 21696 कोटी आणि रु. 21484 कोटी इतके झाले.
30 मे 2021 पर्यंत मुंबईत मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद मे 2021 मध्ये रु. 7246 कोटी तर एप्रिल 2021 मध्ये रु. 16250 कोटी इतकी झाली. मार्च 2021, फेब्रुवारी 2021 आणि जानेवारी 2021 मध्ये मुंबईत मालमत्ता विक्रीचे व्यवहार अनुक्रमे रु. 28961 कोटी, रु. 12989 कोटी आणि रु. 12890 कोटी इतके झाले.
Leave A Reply

Your email address will not be published.