पवना नदीवरील 50 वर्षापूर्वीचा थुगाव बौर पुल पडला

0
पवनानगर : पवन मावळातील पवना नदीवरील थुगाव-बौर पुल पडला आहे. गतवर्षी पवना नदीला आलेल्या महापुरात या पुलाच्या दोन ते तीन मोर्‍यांचा बराच भाग वाहून गेला होता. त्यामुळे हा पुल वाहतुकीस धोकादायक बनला होता. अखेर धोकादायक झालेला हा 50 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला पुल ढासळल्याने या परिसरातील अनेक गावातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अनेक गावांना जोडणाऱ्या या पुलामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. बौर गावच्या हद्दीत वेकेंटेश्वरा कंपनीची  कुक्कुट पालन व कुक्कुट चिकनचे विविध प्रकारचे फुड उत्पादन करणारी वेंकीज कंपनी आहे. या कंपनीतील बहुतांश कामगार हे या पुलावरून कंपनीत कामाला येत जात होते.
पुल ढासळल्याने या कामगारांना कामावर जाण्यासाठी काही किलोमीटर अंतरावरून वळसा घालून जावे लागणार आहे. या पुलापासून वेंकींज कंपनी अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. मात्र थुगाव गाव व परिसरातील गावातील कामगारांना यापुढे 7 ते 8 किलोमीटर वळसा घालून कंपनीत कामावर जावे लागणार असल्याने त्यांना इंधनाच्या दृष्टीने आर्थिक व वाढत्या अंतरामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
गतवर्षी पुलाचा काही भाग ढासळून पुल धोकादायक बनल्यामुळे पुल नवीन उभारण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र तो उभारला न गेल्याने अखेर जीर्ण व धोकादायक थुगाव-बौर पुल आज सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान कोसळला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.