पवना धरणातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

0
पिंपरी : मागील आठ दिवस धुवांधार पाऊस झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण यंदा जुलैमध्येच 85 टक्के भरले आहे. जुलैचा ‘ग्राफ’ पूर्ण झाला असून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पवना धरणातून आज (गुरुवारी) विद्युत जनित्राद्वारे 1400 क्युसेक व  सांडव्याद्वारे 2100 क्युसेक असा एकूण
3500 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
पवना धरणात 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. हवामान अंदाजानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ होत आहे.  पवना धरणाच्या खालील बाजुस नदीतीराकडील सर्व गावातील नागरिकांनी दक्ष राहावे. नदी तीरावरील जनावरे, मोटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावी. जेणेकरून कुठलीही जिवीत व वित्तहानी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
जुलै महिन्यात 85 टक्के, ऑगस्टमध्ये 95 टक्के पाणीसाठा झाला. तर, धरणातून विसर्ग केला जातो. जुलैमध्ये 85 टक्के पाणीसाठा झाल्याने जुलैचा ग्राफ पूर्ण झाला आहे. त्यानुसार पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. दक्षता म्हणून थोडे पाणी सोडावे लागत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.