ठाणे : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह काही अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणी वसुलीची तक्रार एका क्रिकेट बुकीने केली आहे. याबाबत तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात करण्यात आलीय. सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केलीय. यावरून आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत असं नमूद केलं आहे. एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन परमबीर सिंग आणि त्यांच्या टीमने करोडो रुपयांची खंडणी वसुली केल्याचे या तक्रारीत नमूद केलं आहे. परमबीर सिंग आणि त्यांच्या तत्कालीन खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांविरोधात गुरुवारी (29 जुलै) जलान याने याबाबत लेखी तक्रार दाखल केलीय.
परमबीरसिंग यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणी विरोधी पथकाचे माजी वरिष्ठ पीआय प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी आपल्याला धमक्या देऊन साडे तीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनू जालान यांनी केला आहे. तसेच, आपले मित्र केतन तन्ना यांच्याकडूनही 1 कोटी 25 लाख रुपये वसुली केल्याचा दावा देखील केलाय.