दुचाकी चोरणाऱ्या दोघाना अटक, 3 लाखाच्या दुचाकी जप्त

0
पिंपरी  : निगडी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. 3 लाख 2 हजार रुपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त केल्या आहेत.
रफीक मोहंमद रशीद अली शेख (20, रा. काळभोरनगर, पिंपरी), नीरज अजय शर्मा (18, रा. नारायण काळभोर चाळ, काळभोरनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. निगडी परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. निगडी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दुचाकी चोरट्यांच्या मागावर होते.
दुचाकी चोरणारे सराईत गुन्हेगार रफीक आणि नीरज हे ट्रान्सपोर्टनगर येथील रायगड हॉटेल जवळ थांबले असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस नाईक राहुल मिसाळ यांना मिळाली. तसेच त्यांच्याकडे असलेली लाल रंगाची अ‍ॅक्टिवा दुचाकी चोरीची असून ते शहरात फिरत असल्याचे समजले. त्यानुसार निगडी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. तसेच पिंपरी व चिखली परिसरातून मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपींची पोलीस कोठडी घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी 9 अशा एकूण 10 दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपींनी दुचाकी वापरून त्या वेगवेगळ्या ठिकाणी सोडून दिल्या होत्या. पोलिसांनी त्या हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी 7 गुन्हे उघडकीस आणून 3 लाख 2 हजार किमतीच्या दुचाकी जप्त केल्या.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कृष्ण देव खराडे, सहायक पोलीस निरीक्षक एल.एन. सोनवणे, पोलीस हवालदार विक्रम जगदाळे,
राजु जाधव, रमेश मावसकर, आनंद साळवी, पोलीस नाईक शंकर बाबर, विलास केकाण, राहुल मिसाळ, तुषार गेंगजे, पोलीस शिपाई दिपक जाधवर यांच्या पथकाने केली.
Leave A Reply

Your email address will not be published.