मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. त्यानंतर शिवसेना त्यांच्यावर तुटून पडली आहे. कार्यकर्ते-नेते-पदाधिकाऱ्यांनी उत्तरं देऊन झाल्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही थपडीची भाषा केली. आता आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरपार लढाईची भाषा केली आहे. शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असा इशारा देत यायचंय तर या मग, असं बोलावणंच संजय राऊत यांनी लाड आणि राणेंना धाडलं आहे.
बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहाणार नाही! तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर! पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल. त्यासाठी येताना ‘खांदेकरी’ही घेऊन या. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना खांद्यावरच जावे लागते, हा इतिहासच आहे!
कालपर्यंत कुणा दुसऱ्यांच्या बॅगा उचलून गुजराण करीत होते. आज पोटापाण्यासाठी आणखी कुणाचे तरी जोडे उचलत आहेत! असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही. शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच.. असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे.