नवी नियमावली जाहीर ; पुणेसह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम!

0
मुंबई : राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनलॉकबाबतची नवी नियमावली आज जाहीर केली आहे. यामध्ये व्यापारी वर्गांचा रोष पाहता व आज सांगलीत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितल्या प्रमाणे दुकांनाच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. या नव्या नियमावलीनुसार  सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत तर, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत  दुकानं सुरू राहणार आहेत.
या अनलॉकच्या नव्या नियमावलीकडे अवघ्या राज्याचं विशेष करून व्यापाऱ्याचं जास्त लक्ष लागलेलं होतं. यामुळे राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे.  तर, ज्या भागात सध्या करोनाबाधितांची संख्या वाढत आहे, तिथे हा दिलासा नसणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही देखील माहिती आज दुपारी दिली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी रूग्ण कमी होत आहेत तिथल्या नागरिकांसाठीच हा दिलासा असणार आहे. पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम असणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ब्रेक दि चेनचे आदेश जारी केले आहेत. ते उद्यापासून लागू होणार असून काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले असेल तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे. अशा रीतीने हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.  तर, राज्यातील निर्बंध कायम असणाऱ्या ११ जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्ण संख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील.
सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील. सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे , सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत. तसेच, सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने  सुरु ठेवणार. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची आणि जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सुचना करण्यात आली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.