पिंपरी : औंधमधील गणेश गायकवाड टोळीतील बाप-लेकासह पाच जणांवर पिंपरी – चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) कारवाई केली. कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी असे गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. यांच्यावर पुणे शहरातही गुन्हे दाखल आहेत.
टोळीप्रमुख गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (३६), नानासाहेब शंकर गायकवाड (७०, दोघे रा. आयटीआय रोड, औंध) या बाप-लेकासह गणेश ज्ञानेश्वर साठे (३५, रा. पिंपळे – निलख), राजू दादा अंकुश (रा. पिंपळे – गुरव), दीपक गवारे (रा. जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख गणेश आणि नानासाहेब यांच्यासह इतर आरोपींवर दंगा करून खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, अनैसर्गिक संभोग करून खुनाचा प्रयत्न करणे असे एवूâण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत सांगवी, हिंजवडी, पुणे शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत चतुःशृंगी, चंदननगर आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीत पौड पोलिस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हे आरोपी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्याकडे पाठविला. कागदपत्रांची छाननी करून त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी (दि. ३) कारवाईचे आदेश दिले.