पुण्यातील संस्थेकडून काश्मीरमधील युवकांना रोजगार निर्मितीसाठी मदत
३७० नंतर झालेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर लता फॉउंडेशनचा पुढाकार
पुणे : गेल्या 2 वर्षांपूर्वी केंद्र सरकारने जम्मू – काश्मीरच्या केलेल्या बदलांचा सकारात्मक परिणाम दिसत असून, तेथील युवकांना कौशल्य विकासाच्या मदतीने रोजगार निर्मितीसाठी लता फॉउंडेशनच्या वतीने प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
संस्थेचे विश्वस्त अमित जागडे म्हणाले की, लता फॉउंडेशन ही संस्था गेल्या 3 वर्षांपासून शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. महाराष्ट्रात आणि जम्मू – काश्मीरमधील युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्था काही कंपन्यांच्या संपर्कात असून, त्यांच्या मदतीने प्रशिक्षण आणि नोकरीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या उपक्रमाची सुरुवात 5 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातून करण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि जम्मू – काश्मीरमध्ये कोव्हीड संदर्भात मार्गदर्शक तत्वांचे पालन करून शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील वर्षभर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, संस्थेच्या वतीने जम्मू – काश्मीरच्या प्रशासनाला ही या संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे ही अमित जागडे यांनी सांगितले.